तंटामुक्ती अध्यक्ष निवडीच्या वादातून महिला सरपंचास मारहाण, गुन्हा दाखल

। अहमदनगर । दि.09 सप्टेंबर । श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड होत असताना गोंधळ होऊन महिला सरपंचाला मारहाण करण्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की,उक्कडगाव ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना दिलीप कातोरे यांनी अनिल दशरथ महाडीक यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले. त्यानुसार महिला असलेल्या तेथील सरपंचांनी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी गणेश महाडीक यांचे नाव जाहीर करताच, अध्यक्षपद आम्हाला मान्य नाही, असे म्हणत विरोधी गटाने गोंधळ घातला. 

यात महिला सरपंचांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना घडली.  यावेळी विलास तुकाराम महाडीक, राहुल सोपान महाडीक, नितीन सोपान महाडीक, संकेत भीमक महाडीक, अनिल दशरथ महाडीक, राजू बाबूराव कातोरे, दशरथ बापूराव कातोरे, दिलीप कौशीराम कातोरे आदींनी गोंधळ घातला असता सरपंचांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. 

अर्ध्या तासासाठी सभा तहकूब करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यानंतर सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात जात असताना विलास तुकाराम महाडीक यांनी पाठीमागून येऊन त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.

उपसरपंच बापू कातोरे, विश्वास कातोरे व सदस्य प्रसाद महाडीक यांनी, सरपंचांना शिवीगाळ करू नका, असे म्हणताच दोन्ही गटांत बाचाबाची झाली. ग्रामविकास अधिकारी राजू विधाते यांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विरोधी गटातील उमेदवार निघून गेले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. पुढील कारवाई श्रीगोंदा पोलिस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post