। मुंंबई । दि.14 सप्टेंबर । धुळे, नंदूरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या स्थगित केलेल्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल. राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी आज ही माहिती दिली. ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
मदान म्हणाले की, ‘धुळे, नंदूरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड -१९ मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका ९ जुलै २०२१ रोजी आहे, त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या.
या प्रकरणी ९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे ११ ऑगस्ट २०२१ रोजीचे कोविड-१९ संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तत्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत. हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.’
Tags:
Maharashtra
