दिवाळीसाठी फटाका विक्री परवाना एक महिना अगोदर ऑनलाईन द्या : फटका व्यापारी असोसिएशनची मागणी

। अहमदनगर । दि.14 सप्टेंबर । दिवाळी सण जवळ आल्याने शहरात फटाके विक्रीचे परवाने लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने द्यावेत, अशी मागणी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यात म्हटले आहे की, फटाका व्यवसाय हा फक्त दिवाळी सणापुरताच मर्यादीत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व फटाका व्यापार्‍यांवर आर्थिक संकट आलेले आहे. दिवाळीच्या कालावधीमध्ये जर हा व्यवसाय झाला नाही तर व्यापार्‍यांवर फार मोठे आर्थिक संकट ओढावेल. 

म्हणून जर फटाके विक्रेत्यांना परवाना एक महिन्या अगोदर दिल्यास शासनाच्या नियमांचे उल्लंघन न होता फटाका खरेदी ग्राहकांना सोयीस्कररित्या व गर्दी न करता करता येईल. जर विक्री परवाने उशिरा मिळाले तर व्यापारी व ग्राहकांना अनेक संकटांना समोरे जावे लागेल, असे यात म्हटले आहे.

कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच फटाका विक्री परवाने ऑनलाईन पद्धतीने करीत एक महिनाअगोदर उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने देखील सद्य परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन 

फटाका विक्री परवाना ऑनलाईन करुन एक महिना अगोदर देण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना आदेश द्यावा, अशी मागणीही यात करण्यात आली आहे. यावेळी असोसिएशनचे सहसचिव अरविंद साठे, कार्याध्यक्ष सुरेश जाधव, सदस्य सुनील गांधी, संजय सुराणा, अनिल टकले, संतोष तोडकर, उमेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post