10 लाख 09 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
। अहमदनगर । दि.28 ऑगस्ट । महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या सुगंधी तंबाखू, गुटखा, पानमसाला व मावा विक्रेत्या विरुध्द शहरासह जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईची विशेष मोहीम राबवून दि.21 ते 26 ऑगस्ट दरम्यान 8 ठिकाणी छापे टाकून एकूण 10 लाख 9 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 11 जणांच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी आठ ठिकाणी छापे टाकून वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, कच्ची सुपारी, तयार मावा, चूना, मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशिन जप्त करुन 11 जणांविरुध्द कोतवाली, तोफखाना, एमआयडीसीसह शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
तोफखाना हद्दीमध्ये 16 हजार 700 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, सुपारी, माव्यासह आरोपी विजय विष्णू सब्बन (वय 35, रा.दातरंगे मळा, नगर), तसेच तोफखाना हद्दीतच दुसर्या छाप्यात 1 लाख 16 हजार 418 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, पानमसाल्यासह आरोपी राजू नारायण सब्बन (रा.बागडपट्टी, तोफखाना, नगर) याला अटक केली आहे. तर तिसरी कारवाई तोफखाना हद्दीत करुन 62 हजार 452 रुपयांची कारवाई करुन प्रतिबंधीत कंपनीचा पानमसाला व सुगंधी तंबाखूसह अमोल नानासाहेब काळे (रा.रेणूकानगर,बोल्हेगाव,नगर) याला ताब्यात घेतले.
कोतवाली हद्दीमध्ये 5 हजार 400 रुपयांची सुगंधी तंबाखू, सुपारी, माव्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन कारवाई दरम्यान समीर मेहबूब सय्यद (वय 35, रा.नेप्ती ता.नगर) याला ताब्यात घेतले आहे. तर दुसर्या छाप्यातच कोतवाली हद्दीत 18 लाख 700 रुपये किंतीची सुगंधी तंबाखू, सुपारी माव्यासह रियाज रहीमबक्श तांबोळे (वय 53, रा.पारशाखूंट) याला ताब्यात घेतले आहे. तसेच तिसरी कारवाईत कोतवाली हद्दीत 4 लाख 55 हजार 550 रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीच्या सुगंधी तंबाखू, कच्ची सुपारी, चूना तसेच मावा तयार करण्याचे साहित्य इलेक्ट्रिक मशिन व प्लॅस्टिक पिशव्या जप्त करुन रमजान मन्सूर पठाण (वय 30, रा.संजयनगर, काटवण खंडोबा, नगर) याला ताब्यात घेतले.
एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत जप्त मुद्देमाल 3 लाख 17 हजार 800 रुपये किंमतीचे सुगंधी तंबाखू सुपारी, माव्यासह आरोपी राजू शामराव वराट (वय 35, रा.निंबळक, ता.नगर)
शेवगाव पोलिस स्टेशन हद्दीमध्ये 16 हजार 900 रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू व माव्यासह राजेंद्र पंढरीनाथ शिंदे (वय 37, रा.घारतळे गल्ली, बोधेगाव, शेवगाव), लतीफ बाबा शेख (वय 45, रा.भराट गल्ली, बोधेगाव, ता.शेवगाव), रम्मू बाबा शेख (वय 39, रा.सदर), जमीर रशीद शेख (वय 38, रा.मंगलकार्यालयासमोर बोधेगाव, ता.शेवगाव) यांना अटक केली.
तोफखाना, कोतवाली, एमआयडीसी, शेवगांव परिसरामध्ये पोलिसांनी छापे टाकून 11 आरोपींवर कारवाई केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही विशेष मोहिम राबवून सुगंधी तंबाखू, गुटखा, तसेच माव्याच्या विक्री करणार्या धडक कारवाई केली. या छाप्यासत्रामुळे काळाधंदा करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
Tags:
Breaking
