नगरमध्ये रस्त्यावरील भाजी विक्री झाली बंद ; गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

। अहमदनगर । दि.14 एप्रिल ।  नगर शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर होणारी भाजी विक्री प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी व त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने या भाजी विक्रीवर प्रतिबंध घातले आहेत. नगर शहरातील प्रमुख रस्त्यांसह सावेडी, प्रोफेसर कॉलनी चौक व केडगाव परिसरातील रस्त्यांचा यात समावेश आहे.



राज्य शासनाने संपूर्ण राज्यामध्ये 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागू केलेले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने शहरातील काही रस्त्यांवरील नमुद ठिकाणी भाजी व इतर मालाची विक्री व खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊन कोव्हीड-19 या विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता गृहीत धरुन या ठिकाणी 14 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते दि. 30 एप्रिल 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत भाजीपाला व इतर मालाची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

 

यामध्ये अमरधाम समोरील गाडगीळ पटांगण भाजी बाजार, दिल्लीगेट पटांगण येथील भाजी बाजार, चितळे रोड वरील भाजी बाजार, गंजबाजार भाजी मार्केट, प्रोफ़ेसर कॉलनी चौक येथील भाजी बाजार, पाईपलाईन रोड यशोदानगर येथील भाजी बाजार, एकवीरा चौक येथील भाजी बाजार तसेच मनमाड रोडवरील नागापूर गावठाण येथील भाजी बाजार, केडगाव येथील अंबिका बसस्टॉप येथील भाजी बाजार, केडगावलाच अंबिका देवी मंदिर समोरील भाजी बाजार व शाहूनगर पाच गोडाऊन येथील भाजी बाजार आणि लिंक रोड भूषणनगर चौक येथील भाजी बाजार आदी ठिकाणांचा समावेश आहे.

 

कारवाईचा इशारा :

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने प्रशासन नियोजन करीत आहे. याअंतर्गतच बुधवारी रात्री 8 पासून विविध नियम लागू करण्यात आले आहे. यामध्ये भाजी विक्रेत्यांनाही भाजी विकण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजीबाजारात गर्दी होवून कोरोना फैलाव होवू नये यासाठी आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे तसेच कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 45 ऑफ 1860 च्या कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post