रहिमतपूर पालिकेचा बेस्ट फ्रॉम वेस्ट उपक्रम

भंगार साहित्य, टाकाऊ वस्तूंपासून सोनेरी कलाकृती 

 


।  रहिमतपूर । दि.13 एप्रिल ।  रहिमतपूर नगरपरिषदेचा नावीन्यपूर्ण उपक्रम कचरा डेपो, गौळोबा माळ पाणी पुरवठा केंद्र येथील जुन्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये रणगाडा (झणइङखउ अठचध), मिसाईल क्षेपणास्त्र, रॉकेट, तोफ, ढाल, तलवार, बंदूक, सायकल आदी शिल्पकृती तयार करण्यात आल्या आहेत.


रहिमतपूर नगरपरिषदेने शहर सुशोभीकरणाकरता भंगार लोखंडी वस्तूंपासून शिल्पनिर्मिती तयार करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी या कलाकृती बसवण्यात येत आहेत. जुन्या टायरपासून विविध प्रकारचे प्राणी, पक्षी यांची कलाकृती करण्यात आली आहे. यामध्ये हत्ती, वाघ, हरीण, बैल, घोडा, उंदिर, मासा, कोंबडा, बदक, ससा, कासव, पेंग्विन पक्षी, फुलपाखरू अशा विविध आकर्षक सुशोभित वस्तू  तयार करण्यात आल्या आहेत.


महात्मा गांधीजी यांचा चरखा बनवण्यात आला आहे. अध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष  आनंदा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षणामध्ये उत्तम कामगिरी करत शहर सुशोभीकरणाच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.


टाकाऊ व भंगार वस्तूंपासून बनवलेल्या या कलाकृती रहिमतपूर शहराच्या सौंदर्यात निश्‍चितच भर घालणार आहेत. अल्पावधीत ही रहिमतपूरची ठिकाणे बाहेरील पर्यटकांचे ठिकाण व सेल्फी पॉइंट बनतील. स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यापासून रहिमतपूर शहरात सातत्याने उपक्रम राबवण्यात आले आहेत. या वर्षीचा उपक्रम महाराष्ट्रातील वेगळेपण दाखविणारा व शहर सौंदर्यात भर घालणारा नावीन्यपूर्ण उपक्रम ठरेल.


नगरसेवक शिवराज माने व शशिकांत भोसले यांनी आकर्षक स्वरूप देण्यासाठी कंबर कसली आहे. कलाकृती भंगारमधील वस्तू पाहिल्या, की आपोआप काही कलाकृती तयार करण्याची कल्पना डोळ्यासमोर येते व त्यापासून या शिल्पांची निर्मिती होत आहे. त्यातही आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या लढाऊ विमान, क्षेपणास्त्र, मिसाईल,रणगाडा, बंदुका व तोफा आदी कलाकृतींची निर्मिती आवर्जून केल्या आहेत. रहिमतपूर शहरात क्राफ्ट गार्डन उभारण्याचा मानस आहे.


घनकचरा व्यवस्थापन केंद्र व पाणी पुरवठा केंद्र, गौळोबा माळ येथील टाकून दिलेले भंगार लोखंडी वस्तू यामध्ये लोखंडी रॉड, पाइप, पत्रा, अँगल, बेअरिंग आदी टाकाऊ साहित्यापासून कल्पकतेने वेगवेगळ्या शिल्पकृती आकारात येऊ लागल्या आहेत. पाण्याचे पाइप व अँगल याचा वापर करून मिसाईल बनवण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post