देशात यंदा समाधानकारक पाऊस होणारसरासरीच्या 98 टक्के पावसाचा अंदाज

। नवी दिल्ली । दि.17 एप्रिल । देशात कोरोनाचे संकट अधिकाधिक गडद होत असताना देशातला शेतकरी मात्र आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेतीपिकांची वाहतूक, वितरण आणि विक्री करण्यात शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 98 टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

 

या संदर्भातल परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक आणि हिंद महासागर यामध्ये होणार्‍या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून दीर्घ कालावधीसाठीचा दोन टप्प्यांमध्ये सरासरी अंदाज वर्तवला जातो. यात एप्रिल महिन्यात एक आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दिला जातो. दुसरा अंदाज अधिक सविस्तरपणे दिला जातो. यामध्ये देशभरात मान्सूनचा प्रवास कसा राहील, याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.
देशात नैऋत्य मोसमी वार्‍यांमुळे मान्सूनचा प्रवेश होतो. 

 

केरळमध्ये सर्वप्रथम मान्सूनचं आगमन होतं. केरळमध्ये दरवर्षी 120 दिवसांच्या पावसाळ्यामध्ये सरासरी 204.9 सेंटिमीटर मान्सूनची नोंद व्हायची. पण गेल्या वर्षी केरळमध्ये सरासरीच्या तब्बल 9 सेंटिमीटर अधिक म्हणजेच 222.79 सेंटिमीटर इतका पाऊस पडला. साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होतो. मात्र, त्याची निश्‍चित तारीख मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान विभागाकडून जारी केल्या जाणार्‍या अंदाजामध्ये दिली जाते.


केंद्रीय हवामान विभागाकडून पावसाचे प्रमाण सामान्य आहे. कमी आहे किंवा जास्त आहे हे ठरवण्याचे काही मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण कमी मानले जाते. सरासरीच्या 90 ते 96 टक्क्यांच्या मध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्यपेक्षा कमी असे मानले जाते. सरासरीच्या 96 ते 104 टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्य मानले जाते. हेच प्रमाण 104 ते 110 टक्क्यांच्या मध्ये असल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक तर 110 टक्क्यांपेक्षाही जास्त असल्यास अतिवृष्टी मानली जाते.

Post a Comment

Previous Post Next Post