अमरधाममध्ये कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणार्‍या कर्मचार्‍यांना 51 पीपीई कीटची मदत

कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी ‘रोटरी’चा अतिशय संवेदनशील उपक्रम



। अहमदनगर । दि.18 एप्रिल ।  कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असून नगरच्या अमरधाममध्ये दररोज मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार केले जात आहेत. नगर शहराबरोबरच जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यांतील करोना मृतांवरही शासन निर्देशानुसार अंत्यसंस्कार करण्याचे काम येथील कर्मचारी करीत आहेत.

या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी रोटरी क्लबच्या सर्व पाच शाखांच्या वतीने 51 पीपीई कीट्सची मदत देण्यात आली आहे. अमरधामचे व्यवस्थापक स्वप्निल कुर्‍हे यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सचिव ईश्‍वर बोरा, रोटरी इंटिग्रिटीचे डॉ. रिजवान अहमद उपस्थित होते.या उपक्रमासाठी क्षितिज झावरे, रफीक मुन्शी, गीता गिल्डा, अमित बोरकर यांनी योगदान दिले.

प्रसन्न खाजगीवाले म्हणाले की, सध्याच्या अतिशय कठीण काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहे. दुर्देवाने करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर शासकीय निर्देशानुसार अतिशय सुरक्षितपणे अंत्यसंस्कार करावे लागतात.

अमरधाम येथे अशा मृतांवर योग्य पध्दतीने अंत्यसंस्कार करण्याचे काम अनेक कर्मचारी करीत आहेत. त्यांनाही सुरक्षेची तितकीच गरज आहे हे लक्षात घेऊन सदर पीपीई कीट्सची मदत देण्यात आली आहे.

ईश्‍वर बोरा यांनी सांगितले की, कोरोना मृतांवर शासकीय नियमानुसार पूर्ण पावित्र्य राखून अंत्यसंस्कार करण्याचे पुण्याचे काम अमरधाम येथे करण्यात येत आहे. अतिशय धोकादायक परिस्थितीत हे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा विचार करून रोटरी सेंट्रल, रोटरीमिडटाऊन, रोटरी प्रियदर्शनी, रोटरी मेन व रोटरी इंटिग्रिटीच्यावतीने 51 पीपीई कीट देण्यात आले आहेत. भविष्यात या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आणखीही मदत करण्याचा रोटरीचा प्रयत्न राहील.

Post a Comment

Previous Post Next Post