। अहमदनगर । दि.24 मार्च । लग्नात फर्निचर चांगले दिले नाही. तुझ्या घरचे चारचाकी गाडीतून फिरतात. माहेरहून कार घेऊन ये, या कारणावरून नुरेन नबाब इनामदार (23, कोल्हेवाडी) या विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरू होता.
छळास कंटाळून तिने सोमवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात सासरच्या चौघांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नुरेन इनामदारचा माहेरून कार आणण्यावरून तीन वर्षांपासून छळ सुरू होता.
अखेर तिने कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. अलमास नकीर सय्यद (40, ईदगाह मैदान, संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून रियाज नबाब इनामदार, राशद नबाब इनामदार (कोल्हेवाडी), मुमताज पठाण (समशेरपूर, अकोले) व बालम शेख
(मालदाड रोड, संगमनेर) या चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी करीत आहे.
