कायनेटीक चौक अवैध धंदे व अतिक्रमणाच्या विळख्यात

पोलीस व मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कायनेटीक 

चौक  अवैध धंदे व अतिक्रमणाच्या विळख्यात


। अहमदनगर । दि.16 फेब्रुवारी ।  नगर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कायनेटीक चौकात पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अवैधधंदे व अतिक्रमण वाढल्याने येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कायनेटीक चौकात दारु धंदा, मटका, जुगार अड्यासह, मावा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला फुटपाथवर टपर्‍या व हातगाड्याचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले असुन रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनाने नागरिक त्रस्त झाले आहेत.

 


नगर-पुणे रोड व नगर दौंड रोडला जोडणार्‍या कायनेटीक चौकात काही दिवसापुर्वी व्हिआरडीई ने कारंजाचे सुशोभीकरण करुन कायनेटीक चौकाचे व्हीआरडीई चौक असे नामकरण केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर दौंड रोड, कायनेटीक चौकापासुन चारपदरी बनविला, रस्त्याच्या दुतर्फी फुटपाथ व रस्त्याच्या मध्ये दुभाजक बसविले तसेच चौकातील अतिक्रमण काढुन चौकाचा आकार वाढविला. चौकातील कारंजावर रोषणाई करुन चौकाची शोभा वाढविली. परंतु अल्पावधीत चौकात अतिक्रमणाने डोके वर काढले.


फूटपाथवर हातगाडी व टपर्‍यांचे बस्तान : दौंड रोडवरील रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरी धारकांनी राजकिय हस्तक्षेपाच्या मदतीने फुटपाथवरच टपर्‍या व हातगाड्या थांबुन बिनधास्त पणे अतिक्रमण केले आहे. फुटपाथवर चहाच्या टपर्‍या, नाष्टा सेंटर, पानटपर्‍या, हॉटेल चालकांनी अतिक्रमण करुन फुटपाथच गायब करुन टाकली, त्यामुळे टपर्‍या, हातगाड्या व हॉटेल समोर म्हणजेच रस्त्यावरच ग्राहकांच्या दुचाक्या अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे पादचारी नागरिकांना मुख्य रस्त्यावरुन जीव मुठीत धरुन चालावे लागते. कायनेटीक चौक ते गॅस गोडावुन दरम्यान, फुटपाथवर अतिक्रमण झालेले आहे.


चौपदरी रस्ता बनलाय दुपदरी : दुर्तफा फुटपाथवरील अतिक्रमणामुळे दुचाकी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहने रस्त्यावर उभी होतात. तसेच अवैध प्रवासी वाहतुक करणार्‍या जीप, व्हॅन, रिक्षा चौकातच उभ्या राहत असल्याने मोठ्या वाहनांना जाणार्‍यांसाठी एकेरी रस्ता राहतो. दोन्ही बाजुस हिच अवस्था असल्याने मोठी वाहने जाणे येण्यासाठी सिंगल रस्ता राहिल्याने चौकात सायंकाळच्या सुमारास काही काळ वाहतुक कोंडी होते.


चौकातील सिंग्नल बंद : दोन महामार्गावरील वाहतुकीचा मिलाप, चौकातील अतिक्रमण, यामुळे वाहतुक कोंडी होते. परंतु चौकात वाहतुक नियंत्रण करणेसाठी ट्रॉफिक पोलीस नियुक्त नसल्याने त्याच बरोबर चौकातील सिंग्नल बंद असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. सिग्नल सुरु करण्याची मागणी प्रलंबीत असुन पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने सिंग्नल कायम स्वरुपी बंद आहेत.


अवैध धंदे ही जोमात सुरु : कायनेटीक चौक नेहमीच गजबजलेला असल्याने अवैध धंद्याना ही जोर चढलाय. चौकातील दारु विक्री हॉटेल मधुन होत आहे. तसेच मटका व्यवसाय ही दौड रोड चौकालगत मोठ्या धेंडाच्या आर्शीवादाने चालतो. सकाळी पाच वाजल्यापासुन चौकातील पाच-सहा पान टपरी मधुन माव्याची सर्रास विक्री होते. कधी कधी टपरीच्या आजुबाजुला फिरुन ही मावा विक्री जोरात असते.


कायनेटीक चौकातील अवैध धंदे व रस्त्यवरील अतिक्रमण हटवावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. पोलिस व मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मांजराच्या गळ्या घंटा बांधणार कोण अशीच अवस्था येथील नागरिकांची झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post