राष्ट्रवादीच्या खासदार, आमदारांचं एक महिन्याचं वेतन शासनाला देणार ! : शरद पवार
मुंबई – देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांनी आपल्या एका महिन्याचं वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला तर आमदारांनी आपलं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हि माहिती दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहेत. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या संकटावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांसोबत ठाम उभा आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारला मदतीचा हातभार म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य त्यांचे एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एका महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच याचा धनादेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जमा करावा, असं सांगण्यात आलं आहे.
Tags:
Maharashtra
