रक्तपेढीमध्ये एकावेळी पाच रक्तदात्यांना प्रवेश : जिल्हाधिकारी


रक्तपेढीमध्ये एकावेळी पाच रक्तदात्यांना प्रवेश : जिल्हाधिकारी

नगर, (दि.30) : जिल्ह्यातील रक्तपेढ्या आणि काही सामाजिक संस्थांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात परवानगी मागत आहेत. त्याअनुषंगाने रक्तदान करण्याची व्यवस्था असलेल्या रक्तपेढी वा रुग्णालयांमध्ये रक्तदात्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश जारी केले असून  अशी  शिबिरे आयोजित करणाऱ्यांसाठी नियमावली आखून देण्यात आली आहे.

या आदेशानुसार रक्तदात्यांनी केवळ रक्तपेढी मध्येच रक्तदान करण्यात यावे, रक्तपेढीमध्ये एका वेळी केवळ पाच रक्तदात्यांना प्रवेश द्यावा, रक्तदात्यास मागील ३ आठवड्यात कोणत्याही प्रकारचे संक्रमण झालेले नसावे, रक्तदात्याची मागील एक महिन्यात कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली नसावी, रक्तदात्याने रक्तदानापूर्वी जेवण किंवा अल्पोपहार घेतलेला असावा, रक्तदात्याचे वय १८ ते ६० वर्षादरम्यान आणि वजन किमान ५० किलो असावे, रक्तदात्याच्या मागील रक्तदानापासूनचा कालावधी ३ महिन्यापेक्षा अधिक असावा, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ पेक्षा कमी नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिर आयोजकांनी संबंधित रक्तपेढीकडे रक्तदात्यांची नाव आणि मोबाइल क्रमांकानुसार यादी सादर करावी. रक्तपेढीद्वारे रक्तदात्यांना पासेसचे वितरण करावे एका वेळेस जास्तीत जास्त पाचच रक्तदात्यांना रक्तदानासाठी बोलवावे. सर्व रक्तदान शिबिर आयोजक, रक्तपेढ्या आणि रक्तदात्यांनी या नियमावलीची अंमलबजावणी करावी, असे या आदेशात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post