वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा द्या! वीज थकबाकी त्वरित वसूल करा : जगदाळे

वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा द्या! वीज थकबाकी त्वरित वसूल करा

सर्व कल्याणकारी योजनेत वीज ग्राहकांचा सहभाग वाढवा

सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांचे अहिल्यानगर आढावा बैठकीत निर्देश


। अहिल्यानगर । दि.06 फेब्रुवारी 2025 ।   महावितरणकडून ग्राहकांना उत्कृष्ट व  दर्जेदार सेवा द्या सोबतच वीज ग्राहकांकडून वीज देयकाची थकबाकी वेळेत वसूल करा. महावितरणच्या ग्राहक हिताच्या विविध योजना सुरू असून,ग्राहक कल्याणाच्या या योजनांमध्ये अधिकाधिक ग्राहक सहभागी होवून त्यांना लाभ मिळावा यादृष्टीने  प्रयत्न करण्याचे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे (भाप्रसे) यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यांतर्गत महावितरणच्या अहिल्यानगर मंडळाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी  आयोजित बैठकीमध्‍ये श्री. जगदाळे बोलत होते. नाशिक परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, यांची या बैठकीला  उपस्थिती होती. दिलीप जगदाळे म्हणाले, ग्राहकांना विजेची अचूक बिले द्या, चुकीच्या वीज बिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी वीजबिल दुरुस्ती मोहीम राबवा.

प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ग्राहकांचे शून्य वीज बिल होवून फायदा होईल. या योजनेत स्वत:हून ग्राहक सहभागाचे लक्ष्य निर्धारित करून ते साध्य करण्यासाठी कार्य करा. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून शेतीपंपांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठ्याची हमी असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे. सौरग्राम आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना स्वंयस्फुर्तीने गती देण्याचे तसेच या व अशा ग्राहक कल्याणकारी योजनांना अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून चालु वीजबिलासह थकबाकी वसुलीचे लक्ष्य साध्य करून ग्राहकांना विहित कालावधीत, सहज आणि गतीने तत्काळ नवीन वीज जोडण्या व अन्य सेवा द्याव्यात. मार्च अखेरच्या दृष्टीने फेब्रुवारी व मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर वसुली मोहीम राबवून फक्त थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम देखील राबवावी. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून  मुख्य प्रवाहात आणावे अशा सूचना सहव्यवस्थापकीय संचालक श्री. जगदाळे यांनी दिल्या.

अहिल्यानगर मंडळाचे अधिक्षक अभियंता रमेश पवार, अधिक्षक अभियंता पायाभूत आराखडा  महेंद्र ढोबळे, महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) ब-हाटे, तसेच विभागातील कार्यकारी अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post