। अहमदनगर । दि.10 जुलै 2023 । डोंगरी पट्ट्यातील वस्ती शाळेतील विद्यार्थांच्या महिला पालकांमध्ये सुसंवाद घडवत मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या, वेळप्रसंग विद्यार्थांच्या मदतीला धावून जाणाऱ्या दीपाली जाधव या प्राथमिक शिक्षिकेची बदली झाली. या बदलीने शाळांतील मुले व पालक हेलावून गेले.
चांदबीबी महालाच्या पायथ्याशी एक छोटीशी वस्ती शाळा आहे. लमाणतांडा येथे विशेषतः जंगम, मुस्लिम व लमाण समाजाची मुले शिक्षण घेतात. शिक्षिका जाधव या शाळेत तेरा वर्षांपूर्वी हजर झाल्या. त्यावेळी शाळेत अवघा १० विद्यार्थांचा पट होता. पालकांमध्ये शिक्षणाविषयी असलेली अनास्था हेच त्याचे कारण होते.
या परिसरातील सर्व पालक मोलमजुरी करणारे आहेत. परिणामी मुलींचे शिक्षण लवकर थांबले जायचे. त्यांची लवकर लग्न केली जायची. जाधव यांनी प्रयत्न करून येथील महिला पालकांमध्ये संवाद घडवून आणला. त्यांच्यात मुलीच्या शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली.
वस्तीवरील मुलांना चांगले शिक्षण देण्यासोबत अनेक स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, निबंध असे नवनवीन उपक्रम राबवले. वस्ती शाळेत दोनच शिक्षक असतात. मॅडम आणि त्यांचे सहकारी शिक्षिका कल्पना शेलार यांच्या मदतीने पाच वर्षांपूर्वी येथे पाचवीचा वर्ग सुरू केला.
तत्कालीन गट शिक्षणाधिकाऱ्यांनीदेखील या प्रयत्नांचे कौतुक केले. पाचवीत या मुलांना स्कॉलरशिपसाठी मार्गदर्शन केले. आज येथील पट दुप्पट झाला आहे. परिसरातील महिलांचे वैयक्तिक कोणतेही प्रश्न असो त्यामध्ये नेहमी सहकार्य केले.
जाधव यांची बदली झाल्यानंतर साहजिकच तेथील विद्यार्थी आणि पालकही भावूक झाले. अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
Tags:
Ahmednagar
