। अहमदनगर । दि.22 एप्रिल । पोटच्या मुलाचा खून करणाऱ्या बापाला जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी जन्मठेप व पाच हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. गोरख ऊर्फ गोरक्षनाथ किसन कर्पे (वय ४५ रा. आखेगाव ता. शेवगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने मुलगा सोमनाथ (वय १८) याचा खून केला होता. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन बी. पवार यांनी कामकाज पाहिले.
२९ मार्च २०२१ रोजी मयत सोमनाथची आई सायंकाळी शेतातून काम करून घरी आल्या होत्या. त्यावेळी मुलगा सोमनाथ व पती गोरख कर्पे हे दोघेच घरी होते. गोरख हा दारू पिऊन घरी आला होता. आज होळीचा सण असून तुम्ही सणासुदीच्या दिवशी दारू का पिऊन आला?, असे सोमनाथच्या आईने विचारले असता गोरखला त्याचा राग आला.
तो तिला मारण्यासाठी पुढे आला असता मुलगा सोमनाथ मध्ये आल्याने गोरखने त्याला शिवीगाळ केली व घरातून निघून गेला. त्यानंतर रात्री सोमनाथ हा ऊसाला पाणी देत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास गोरख कर्पे याने लोखंडी गजाने सोमनाथच्या डोक्यात मारले. उपचारादरम्यान सोमनाथचा मृत्यू झाला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्यावतीने एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील अर्जुन पवार यांनी केलेला युक्तिवाद, न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा ग्राह्यधरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. खटल्यामध्ये पैरवी अधिकारी सहायक फौजदार महेश जोशी व शेवगाव पोलिस ठाण्याचे अंमलदार सचिन खेडकर यांनी सहकार्य केले.
-------------
खालील बातम्या देखील वाचा...
