उन्हाळ्याच्या सुट्टीत भरणार जिल्हा परिषद शाळा....


 । अहमदनगर । दि.17 मार्च । कोवीड काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुशेष भरुन काढण्यासाठी उन्हाळयाच्या सुटटीत शाळा भरविण्याबाबत प्राप्त मागणीनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, आदींनी सभेच्या चर्चेत सहभाग घेऊन महत्वपुर्ण सुचना मांडून त्यास अनुमोदन दिले.

सभेचे कामकाज समितीचे सचिव तथा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी पाहिले.  शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सर्व गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाचे प्रतिनिधी व इतर अधिकारी उपस्थित होते.

मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. शिक्षण विभागाकडील योजनांचा आढावा घेण्यात आला. शिक्षण विभागातंर्गत बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.

एकयएप्रिल २०२२ ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन घेण्याबाबत तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या.

तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचा शाळानिहाय आढावा घेऊन तालुका अंतर्गत जेथे शाळेचा पट वाढला, पट आहे, पण शिक्षक कमी अशा ठिकाणी प्राधान्याने शिक्षकाची तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था करावी, अशी सूचना देण्यात आली.

इयता दहावी व बारावी परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त, पारदर्शक पध्दतीने घेण्यासाठी सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेने व नेमलेल्या भरारी पथकाने प्रयत्न करावेत, असे बैठकीत सूचित करण्यात आले.

एक दिवस शाळेसाठी या उपक्रमासह शैक्षणिक गुणवत्ता व दर्जावाढीसाठी भेटी देताना शाळा भरण्याआधी किंवा सुटण्याआधी शाळेत उपस्थित राहुन पडताळणी करावी, अशी सूचना शेळके यांनी दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post