। मुंबई । दि.15 मार्च । विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फॉर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, विविध मार्गाने माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा हा प्रयत्न असून मी न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. तसेच, ही कारवाई सुडभावनेने केली आहे असही दरेकर यावेळी म्हणाले आहेत.
प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं.
दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली.
मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. योगायोग म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा दावा विधानसभेत केला होता. त्यानंतर आज दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.