शहराच्या मुख्य बाजारपेठेतील फेरीवाल्यांची अतिक्रमणे मनपाने हटवली

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील फेरीवाल्यांची अतिक्रमणे मनपाने हटवली 


 
। अहमदनगर । दि.14 मार्च । महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नगरच्या बाजारपेठेतील हातगाडीवाले, फेरीवाल्यांची अतिक्रमणे आज हटवली आहेत.

सोमवारी (दि.14) सकाळपासून नगरच्या बाजारपेठेने मोकळा श्वास घेतल्याचे पहावयास मिळाले. बाजारपेठेत महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम यापुढे कायम राबविण्यात येणार असून पुन्हा हातगाड्या लावल्या तर त्या जप्त करून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका पथकाने दिला आहे.

कापड बाजारात शनिवारी (दि.12) हातगाडी लावणार्‍यांनी व्यापार्‍यांना शिवीगाळ, दमबाजी व धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी बाजारपेठेतील व्यापार्यांनी आक्रमक भूमिका घेत घासगल्लीकडे जाणार्‍यां रस्त्याच्या चौकात रास्तारोको करत ठिय्या आंदोलन केले होते.

बजरंग दलाचे शहराध्यक्ष कुणाल भंडारी यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता. तसेच आ.संग्राम जगताप यांनीही बाजारपेठेत येवून व्यापार्‍यांशी, पोलिस व महापालिका अधिकार्‍यांशी चर्चा केली होती.

बाजारपेठेतील हातगाडीवाले फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली होती. त्यावेळी मनपा उपायुक्त यशवंत डांगे यांनी सोमवारी (दि.14) सकाळपासून बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे, अतिक्रमण विभागप्रमुख वैभव जोशी, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, अर्जुन जाधव यांच्यासह अतिक्रमण विभाग व बांधकाम विभागाचे पथक सोमवारी (दि.14) सकाळीच बाजारपेठेत दाखल झाले. एवढा मोठा फौजफाटा पाहून हातगाड्या व रस्त्यावर दुकाने थाटण्याच्या तयारीत असलेल्यांची चांगलीच धावपळ झाली.

अवघ्या काही वेळातच सर्व हातगाड्या तेथून गायब झाल्या.दुपारी उशिरापर्यंत महापालिकेचे पथक व पोलिसांचा फौजफाटा बाजारपेठेतच तळ ठोकून होता. आज सर्वांना सूचना देण्यात आल्या असून पुन्हा जर बाजारपेठेत रस्त्यावर हातगाड्या अथवा दुकाने लावली तर ते साहित्य जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post