महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नगर जिल्ह्याचा मेळावा संपन्न
सहकार चळवळ वाढीस पूरक भूमिका घेण्यासाठी लेखापरीक्षकाचे काम महत्वाचे : राज्य अध्यक्ष रामदास शिर्के
। अहमदनगर । दि.12 मार्च । देशात महाराष्ट्र राज्य हे सहकार चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. या चळवळीचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक हित मोठ्या प्रमाणात जोपासले जात आहे. लेखा परीक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी लेखापरीक्षकाला येणार्या अडीअडचणीची माहिती देणे गरजेचे आहे. कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रशिक्षनाची खरी गरज आहे.
या करीता महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने राज्याचा दौरा करून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लेखा परीक्षकांना येणार्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा निहाय मेळाव्याचे आयोजन केले आहे. शासनाच्या परीपत्रकाचे पालन करणे तसेच राज्यत सहकार चळवळ वाढीस पूरक भूमिका घेण्यासाठी लेखापरिक्षक काम करत आहेत असे प्रतिपादन राज्याचे अध्यक्ष रामदास शिर्के यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित नगर जिल्ह्यातील मेळाव्याचे उद्घाटन अध्यक्ष रामदास शिर्के यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सचिव उमेश देवकर, सहसचिव दत्तात्रय पवार, खजिनदार संदीप नगरकर, संजय घोलप, श्रीकांत चौगुले, बाळासाहेब वाघ, संजय वाणी, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग लांडगे, सोमनाथ सोनवणे, दत्तात्रय बोंबले, परशुराम कोतकर आदी उपस्थित होते.
आबासाहेब देशमुख म्हणाले की, सहकार संस्थांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लेखापरीक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात याच बरोबर संस्थांनमध्ये गैरव्यवहार नियंत्रणात आणण्यासाठी काम करत असतात. लेखा परीक्षकांची संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभर संपर्क अभियान सुरू केले आहेत.लेखा परीक्षकाच्या कामकाजाची भूमिका सहकार क्षेत्रात महत्त्वाची असते.
कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी असोसिएशन राज्यभर मार्गदर्शन करीत आहेत. नवनवीन कायदे तयार होत आहेत. याची माहिती लेखा परीक्षकांना मिळावी यासाठी शिबिराची खरी गरज आहे. कामकाजातील अडीअडचणी समजावून घेऊन सहकार मंत्री व आयुक्त यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे काम केली जाते असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग लांडगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन राज्य सचिव उमेश देवकर यांनी केले.