। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी । युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तेथे अडकलेल्या अहमदनगरच्या जवळपास 40 विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा प्रभारी डॉ.सुरेश शेळके, जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, विशाल कोळगे, महासचिव योगेश साठे व अनिल जाधव यांनी केले आहे.
युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित मोफत विमान सेवा उपलब्ध करून त्यांना मदत करणे अपेक्षित आहे, असे स्पष्ट करून वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, बिहार,हरियाणा व राज्यस्थान राज्यांनी तेथील मुलांना घेवून येण्यासाठी पावले उचलली आहेत.
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरु झाले आहेत. भारतात परतण्यासाठी ते तिकीट काढण्यास तयार आहेत पण केंद्र व राज्य सरकारने तिकीट दर कमी करण्याचा विचार न करता त्यांना लवकरात लवकर आपल्या भारतात कसे त्यांच्या परिवारापर्यंत पोहचवता येईल या दृष्टीकोनातून विचार करायला हवा आहे, असेही वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे.