पाईपलाईन रोडवर पुन्हा धूम स्टाईल चोरी

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पाईपलाईन रोडवर पुन्हा धूम स्टाईल चोरी


। अहमदनगर । दि.14 सप्टेंबर । पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका 63 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील 12 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी धूम स्टाईलने पळवून  नेल्याची घटना मंगळवारी (दि.14) घडली. पाईपलाईन रोडवरील श्रीकृष्णनगर येथे मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, मनकर्णा जालिंदर गोसावी (रा. श्रीकृष्ण नगर, सागर हॉटेल समोर, पाईपलाईन रोड, अहमदनगर) या सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या गेटसमोर रांगोळी काढत होत्या. रांगोळी काढून त्या घरात जात असताना एका काळ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना चिट्ठी दाखवत पत्ता विचारण्याचा बहाणा केला व त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले. 

या घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी आदींसह तोफखाना पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

याप्रकरणी गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने चेन स्नॅचिंगच्या घटना सावेडी उपनगर परिसरात घडत असल्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. 

सोमवारी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सकाळी पायी फिरणार्‍या पुरुषाच्या गळ्यातील चेन ओरबाडण्याची घटना घडल्यावर मंगळवारी सकाळी पुन्हा महिलेचे मंगळसूत्र हिसकावले गेल्याने सावेडी परिसरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

Post a Comment

Previous Post Next Post