बंद असलेल्या जि.प.शाळेच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

। अहमदनगर । दि.09 सप्टेंबर । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद आहेत. याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने चक्क शाळेतील साहित्य चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे उघडकीस आली आहे.

गुंडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने शाळेत प्रवेश करत 2 काळ्या रंगाचे फळे, 2 लाकडी खुर्च्या, 4 पाईप, 15 लोखंडी गज, हार्मोनियम पेटी, जुन्या 2 पेट्या, जुने रद्दी पेपर या बरोबरच जुने शालेय रेकॉर्ड, गोष्टीची पुस्तके आदी साहित्य चोरुन नेल्याची घटना मंगळवारी (दि.7) सकाळी 10 च्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत शाळेचे मुख्याध्यापक प्रविण विठ्ठल डावखरे (रा.भूषणनगर, केडगाव) यांनी बुधवारी (दि.8) दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं. वि.क. 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
शहर आणि उपनगरासह आता शहराच्या जवळ असलेल्या गावांनाही चोरट्यांनी लक्ष केले आहे. चोरट्यांनी शहरातसह आता तालुक्यातील गावांनाही लक्ष केले आहे. दुचाकीचोरी, घरफोडी आदी घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. पोलिसांनी आता आपली गस्त वाढवावी अशी अपेक्षा नागरीकांमधून होताना दिसत आहे. तरच चोर्‍यांच्या घटनेत घट होईल असा विश्वास नागरीक व्यक्त करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post