शेतीच्या मोजणीच्या वादातून शस्त्राने मारहाण चौघांकडून खुनाची धमकी

। अहमदनगर । दि.17 सप्टेंबर । शेवगाव तालुक्यातील थाटे शिवारातील गट नंबर 23/2 मधील शेतीची भावकीतील सामाईक वहितीवेळी अडचण निर्माण करून आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने केदार यांनी सामाईक क्षेत्राची मोजणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मोजणीच्या दरम्यान वाद झाला अन् शस्त्राने बेदम मारहाण करुन खुनाची धमकी दिली. ही घटना थाटे येथे घडली.

याबाबत माहिती अशी की, शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालय शेवगाव येथे अर्ज व चलन देवून मोजणीची तारीख निश्चित करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली. मात्र, सामाईक क्षेत्रातील हिस्सेदार अंबादास लहानू केदार, गणेश लहानू केदार व त्यांचे पुतणे अक्षय भानुदास केदार व राहुल भानुदास केदार यांनी ही नोंदणी मंजूर होताच मोजणीस हरकत व अडथळा निर्माण करत दमदाटी करण्यास सुरुवात केली.

तसेच वेळोवेळी अडचण निर्माण करून त्रास होईल अशी वागणूक करू लागले. याबाबत दि. 9 रोजी सायंकाळी शोभा महादेव केदार, महादेव जयदेव केदार, अक्षय महादेव केदार, बाळकृष्ण महादेव केदार आदींना लोखंडी विळ्याने जखमी करुन लाकडी काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व एकेकाचा खून करून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील कारवाई शेवगाव पोलिस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post