शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा : पगडाल

। अहमदनगर । दि.06 सप्टेंबर ।  तातडीने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट (टीडीएफ)चे राज्य कार्यवाह हिरालाल पगडाल यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेलने पत्र पाठवून टीडीएफची भूमिका शिक्षक दिनी मांडून सर्व शाळा सुरू कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जगातील अनेक देशांनी कोविडच्या तिसर्‍या लाटेचा धोका असूनही आवश्यक ती दक्षता घेऊन शाळा सुरू केल्या आहेत. देशातील अनेक राज्यात शाळा सुरु झाल्या आहेत. राज्य सरकारने देखील आवश्यक ती दक्षता घेऊन तातडीने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कॉलेजेस बंद आहेत. करोना प्रादुर्भावामुळे काही काळासाठी ते अपरिहार्य होते. परंतु आता शाळा सुरू करणे गरजेचे झाले आहे. गेले दीड वर्ष शाळा बंद आहेत. त्याचा खूप मोठा दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुमारे दीड वर्षाचा अध्ययन दुरावा निर्माण झाला आहे.

इतका मोठा गॅप भरून काढायला खूप मोठा कालखंड लागणार आहे. हा गॅप अधिक वाढवणे समाजासाठी व विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे आहे. त्याचे दूरगामी परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहेत. विद्यार्थी घरीच असल्यामुळे त्यांचे समाज जीवन कुंठित झाले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास खुंटला आहे.

त्यांच्यात एकलकोंडेपणा, चिडचीड वाढली आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.सरकारने ’शाळा बंद शिक्षण चालू’ या मोहिमेंतर्गत ऑनलाईन एज्युकेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिक्षणात खूप मोठी विषमता निर्माण झाली आहे. जागृत व आर्थिकदृष्ट्या संपन्न पालकांच्या पाल्यांनाच याचा लाभ झाला आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी हवा असणारा स्मार्ट फोन नाही, दुर्गम भागात नेट कनेक्टिव्हिटी नाही, डेटा पॅक घेण्याची ऐपत नाही इ.कारणांमुळे गोरगरीब, शेतकरी, मजूर, कष्टकरी, हातावर पोट असलेला वर्ग ऑनलाईन शिक्षण घेऊ शकला नाही. शिक्षणात निर्माण झालेली ही मोठी दरी महाराष्ट्र राज्याच्या भविष्यावर गंभीर परिणाम करणारी ठरेल,असा त्यांनी इशारा दिला आहे.

शाळा बंद असल्यामुळे बालमजुरी आणि मुलींचे बालविवाह यांचे प्रमाण वाढले आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन न करताच, विद्यार्थ्यांना कोणते कौशल्यप्राप्त झाले आहे. याचे मूल्यमापन न करताच, विनापरीक्षा विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलले गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लर्निंग गॅप तसाच राहिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post