। अहमदनगर । दि.17 एप्रिल । |कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने पंधरा दिवसाची संचारबंदी लागू केली असून, या कालावधीत शाळा, महाविद्यालयांची कार्यालय सुरु ठेवणे, शिक्षकांची उपस्थिती याबद्दल स्पष्ट आदेश निर्गमीत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण उपसंचालक व राज्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन पाठवले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. राज्यात कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेली अत्यंत भयावह, गंभीर परिस्थिती विचारात घेऊन कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी १ मे पर्यंत संचारबंदीची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
या कालावधीत शाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले नाही, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती संदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेला नसल्याने राज्यातील शिक्षण क्षेत्रात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
