शाळकरी मुलाचा तलावात बुडून दुदैवी मृत्यु

। अहमदनगर । दि.27 मार्च । राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेला शाळकरी मुलाचा वांबोरी येथील मळगंगा तलावात बुडून दुदैवी अंत झाला.  या तलावामध्ये मुलगा बेपत्ता झाल्याचे समजताच नागरिकांनी तळ्याभोवती गर्दी केली. मुलाचा दुदैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

वांबोरी येथील एका माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकणारा आदित्य सुनील कुसमुडे (वय 13) हा शुकवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत वांबोरी येथील मळगंगा तलावात पोहण्यासाठी गेला होता.  पोहताना पाण्यात गाळ असल्याने त्याला पाणी आणि गाळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला.

तलावात मुलगा बुडाल्याची वार्ता गावात वार्‍यासारखी पसरली. बुडालेल्या मुलाला वाचविण्यासाठी नागरिकांनी मळगंगा तलाव येथे गर्दी केली. तीन तास शोधाशोध केल्यानंतर आदित्यचा शोध लागला. त्याला बाहेर काढल्यानंतर तत्काळ वांबोरी ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी अंजली मंडलिक यांनी मृत झाल्याचे सांगितले.

मृत आदित्यचे शवविच्छेदन करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके, पोलिस हेड कॉन्स्टेबल शैलेज सरोदे, पोलिस कॉन्स्टेबल सुशांत दिवटे, आदिनाथ पालवे, शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post