नवीदिल्ली, , (दि.25 ऑक्टोबर) : केंद्र सरकारने 2019-20 वर्षातील वैयक्तिक प्राप्तिकर भरण्यासाठीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मुदतवाढीमुळे आता करदात्यांना 31 डिसेंबरपर्यंत प्राप्तिकर भरता येणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वैयक्तिक आयकरदात्यांना 2019-20 या वर्षातील कर भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. आयकर भरण्यासाठी यापूर्वी 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती.
केंद्र सरकारने 13 मे रोजी आयकर भरण्यासाठी निश्चित केलेली 31 जुलैपर्यंतची तारीख वाढवून 30 नोव्हेंबर केली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने त्यावेळी असे म्हटले होते, की कोरोना संकटामुळे करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंतचा कालावधी वाढवण्यात येत आहे.
प्राप्तिकर अधिनियमानुसार ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, अशा करदात्यांसाठी (त्यांच्या भागधारांसह) आयकर विवरणपत्र देण्याची तारीख 31 ऑक्टोबरऐवजी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आयकर भरण्यासाठी कालावधी केंद्र सरकारकडून तब्बल चार वेळा वाढवण्यात आला आहे. यापूर्वी 31 मार्चवरून 30 जून करण्यात आला होता. त्यानंतर 31 जुलै आणि नंतर 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
