| अहिल्यानगर | दि.31 ऑक्टोबर २०२५ | दारूच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून, एका ७० वर्षीय हॉटेल मालकावर लाकडी दांडक्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना (दि. २९) सकाळी सावेडी रोडवरील भुतकर वाडी परिसरात घडली. 'कशाचे पैसे मागतोस' असे म्हणत आरोपींनी हॉटेल मालक आणि त्यांच्या वेटरलाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला.
या हल्ल्यात हॉटेल मालक प्रकाश मनोहर घाडगे (वय ७०, रा. टांगे गल्ली, नालेगांव) हे जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यात घाडगे यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. हे पाहताच, चौघेही आरोपी 'तुम्हाला जिवे मारू' अशी धमकी देत त्यांच्या चारचाकी वाहनातून मनमाड रोडच्या दिशेने पसार झाले.
वेटर शाहरुख मंडल याने तात्काळ जखमी घाडगे यांना मोटारसायकलवरून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार घेतल्यानंतर घाडगे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.याप्रकरणी अभिषेक तांबे व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सावेडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
