नगर,(दि.23) : करोना महामारीच्या पार्श्वभुमीवर पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत . सगळीकडे लॉक डाऊन असतांना ग्रामिण व शहरी भागात पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालुन पाळीव जनावरांवर उपचार करीत आहेत. परंतु सुविधा व विमा संरक्षणापासुन ते वंचीत आहेत. तरी या बाबी लागु कराव्यात अशी मागणी नगर जिल्हयाचे पालक मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे कडे निवेदनाद्वारे पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने केली आहे.
पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक हे आजारी पशुधनाचा जीव वाचविण्या साठी पशुपालकांच्या दारात जाऊन सेवा उपलब्ध करून देत आहेत. तसेच पशुपालकांना स्वतःची व पशुची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. हे सर्व करत असतांना पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी अनेक व्यक्तींच्या संपर्कात येत आहेत.ही बाब निवेदनात निदर्शनास आणली असुन. या कर्मचाऱ्यांना पुढील ९० दिवसासाठी किमान एक कोटीचे विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.चंद्रशेखर सोनावळे सचिव डॉ.नितिन निर्मळ कार्याध्यक्ष डॉ . संजय कढणे व कोषाध्यक्ष डॉ.गंगा निमसे यांनी केली आहे .
पशुवरील उपचाराचे सेवाशुल्क नको
लॉक डाऊन असल्याने शेतमाल मातीमोल भावाने विकला जात असुन दुधाचे दर अत्यंत कमी झालेले आहे . अशा परिस्थितीत पशुपालकांना पशु वरील उपचाराचे सेवाशुल्क व कृत्रिम रेतनाचे सेवाशुल्क देणे अवघड झालेले आहे . पशुपालकांकडुन कोणतेच सेवाशुल्क आकारण्यात येऊ नये . अशीही मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे .
