मुख्यमंत्र्यांची घोषणा



औरंगाबाद विमानतळाचे नाव आता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्यात आले आहे. राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. औरंगाबादच्या विमानतळाला चिखलठाणा विमानतळ असेच आजपर्यंत ओळखले जात होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील 'धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ' असे नाव करण्याबाबतचा ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे. याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्‍यान, औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याची शिवसेनेची जुनीच मागणी आहे. मात्र आता मनसेने हा विषय हाती घेतला आहे. शिवसेना आघाडीच्या सत्तेत असल्‍याने या विषयावरून दबाव वाढवत जायची मनसेची रणनीती आहे. त्‍याला आता या माध्यमातून शिवसेनेने प्रत्‍युत्तर देण्याचा प्रयत्‍न केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post