राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी दादाभाऊ कळमकरांच्या नावाची चर्चा



। अहमदनगर । दि.27 सप्टेंबर । विधान परिषदेची निवडणूक जशी जवळ येत आहे. तसेच आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. राष्ट्रवादीच्या गोटात सध्या ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या नावाने आघाडी घेतलेली आहे. कळमकर यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोरधरू लागली आहे.

विधान परिषदेची निवडणुकीला अवधी असला तरी सध्या राजकीय वर्तुळात मोर्चे बांधणी सुरु झालेली आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते आमदार अरुणकाका जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार, माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु असली तरी यामध्ये दादाभाऊ कळमकर यांचे नाव वरच्यास्थानी आहे.

जिल्ह्यातील इतर नेत्यांना पक्षाने वेळोवेळी संधी देऊन त्यांचे पुर्नवसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादाभाऊ कळमकर यांच्याबाबतीतही पक्षाने वेळोवेळी संधी देऊन तसा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्यांची पक्षाबाबत असलेली एकनिष्ठपणा पाहून पक्षाने त्यांना आता संधी देण्याची गरज आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या बांधणीपासूनच ते पक्षात आहेत. त्यांनी पक्षाला अडचणीच्या काळात साथ देऊन संघटनांत्मक बांधणी केलेली आहे.  त्याचा फायदा पक्षाला शहरासह जिल्ह्यात होत आहे. आता त्यांना पक्ष निष्ठेचे फळ आता देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत दादाभाऊ कळमकर यांना संधी द्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

दादाभाऊ कळमकर यांनाच पक्षाने संधी द्यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटीसाठी जाणार असल्याची सध्या राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा सुरु आहे. दबक्या आवाजातील चर्चा आता उघडपणे सुरु झालेली आहे. त्यामुळे देशाचे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post