मनपात कोरोनाचा पुन्हा शिरकाव, नागरिकांना प्रवेश बंदी

अनेक अधिकारी-कर्मचारी पॉझिटीव्ह,

दोघांच्या मृत्यूनंतर तातडीने घेतला निर्णय


। अहमदनगर । दि.13 एप्रिल ।  महापालिकेच्या दोन कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी मनपाच्या मुख्यालयासह माळीवाड्यातील जुने कार्यालय तसेच प्रभाग कार्यालयांतून नागरिकांना (अभ्यागत) प्रवेश बंदी केली आहे. दरम्यान, मनपाच्या आणखी काही अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाबाधा झाल्याने मनपात सध्या अस्वस्थ वातावरण आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेत कार्यरत असलेल्या अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यालयासह सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी याबाबत कार्यालयीन आदेश काढला आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असलेले महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधीत होऊ लागले आहेत. त्यामुळे आयुक्त गोरे यांनी यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या औरंगाबाद रस्त्यावरील मुख्य प्रशासकीय इमारतीसह माळीवाड्यातील मनपाचे जुने कार्यालय तसेच सावेडी, झेंडीगेट, बुरुडगाव रोड येथील प्रभाग कार्यालये

तसेच केडगाव व नागापूर येथील उपकार्यालयांच्या आवारात नागरिकांना व अभ्यागतांना प्रवेशबंदी केली आहे. जे नागरिक व अभ्यागत प्रशासकीय इमारत वा मनपाच्या इतर कार्यालयांमध्ये दिसून येतील, त्याला संबंधित विभाग प्रमुख व शाखा प्रमुख यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरुन त्यांच्यावर साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त गोरे यांनी दिला आहे.


दोघा कर्मचार्‍यांचा मृत्यू : कोरोनाबाधीत झालेल्या महापालिकेच्या दोन कर्मचार्‍यांचा रविवारी (दि.11) रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यातील एक कर्मचारी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात तर एक कर्मचारी झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालयात कार्यरत होता.  कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व अधिकारी - कर्मचार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे तसेच कार्यालयीन कामकाज करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन आयुक्त गोरे यांनी महापालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post